आर्थिक नियोजन (Financial Planning) म्हणजे काय? का करावे?

आर्थिक नियोजन म्हणजे काय? का करावे?
नोकरी, शेती, किंवा व्यापार माध्यमातून जेव्हा आपल्या उत्पन्नास सुरुवात करतो तेव्हा आपणांवर कुटुंबाच्या जबाबदारीचा श्री गणेशा होतो असे आपण मानतो.
उत्पन्नास सुरुवात केल्यावर आपल्यावर भविष्यामध्ये स्वतःच्या तसेच भावंडांच्या लग्नाची, आई वडिलांच्या सांभाळाची - आजारपणाची, मुलांच्या शिक्षणाची-लग्नाची, मुलांच्या, पत्नी आणि स्वतःच्या आजारपणाची, तसेच स्वतःच्या निवृत्तीची जबाबदारी येणार असते. याबरोबरच प्रत्येकास आपल्या मनातील स्वप्नांना आकारही द्यायचा असतो. मोठे घर, छानसे वाहन, या बरोबर भरपूर पर्यटन हि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आर्थिक नियोजन अतिशय महत्वाचे ठरते. योग्य आर्थिक नियोजन केल्यास कोणतेही कर्ज घेता आपण आपली स्वप्ने कमी उत्पन्न असताना देखील पूर्ण करू शकतो.

Arthik Niyojan

आर्थिक नियोजन म्हणजे नक्की काय तर विविध आर्थिक साधने वापरून भविष्यामध्ये येणाऱ्या मोठ्या खर्चाची खात्रीशीर तरतूद त्याच बरोबर ठराविक वयानंतर आर्थिक स्वातंत्र्य मिळवून काम करता केलेल्या गुंतवणुकीच्या परताव्यावर समृद्धसुखी आयुष्य जगणे होय.

अनेक वेळेस आपण पाहतो कि एखाद्या कुटुंबामध्ये घरातील कर्ता व्यक्ती अनेक जबाबदाऱ्या मोठ्या कष्टाने पार पाडत असतो. या जबाबदाऱ्या पूर्ण होत असताना मात्र त्या व्यक्तीची दमछाक होते, प्रत्येक वेळेस पैश्यांची जुळणी करतांना ते हमखास कमीच पडतात. या कमी पडलेल्या पैशांच्या जुळणीवरचा नेहमीचा तोडगा म्हणजे तडजोड, वैयक्तिक किंवा कौटुंबिक हौसमौज कमी करणे, ऐनवेळी थोडे कमी मार्क पडलेल्या मुलास इंजिनीरिंग किंवा मेडिकल ऐवजी विज्ञान पदवीला प्रवेश घेणे किंवा मोठे कर्ज काढून शिक्षण सुरु करणे. मुलीच्या - मुलाच्या लग्नाला परत कर्ज काढणे, अचानक कोणी आजारी पडले तर सोने विकणे, मोठ्या आजारासाठी जमीन विकणे, आणि या वर कळस म्हणजे अधिक व्याजाने सावकारी कर्ज घेणे, या सारखे प्रकार सर्रास घडत असतात. चांगल्या दवाखान्याचे उपचार न करता फक्त मोफत उपचाराचा शोध घेणारे अनेक लोक आपणास दिसतील.  फक्त हौस मौज आणि खोटा दिखावा यासाठी देखील आहे त्या संपत्तीचा नाहक वापर करणे आणि अधिक व्याजाचे कर्ज वाढवणे हा मार्ग अनेकजण वापरतात.

एखाद्या प्रसंगी घरातील मुख्य उत्पन्न करणारा व्यक्ती अपघाती किंवा नैसर्गिक कारणाने अचानक मृत्यू पावला तर मात्र त्या कुटुंबाची दयनीय अवस्था होते. कुटुंबाच्या होणाऱ्या या नुकसानीस मात्र अप्रत्यक्षपणे आर्थिक नियोजन न करणारा मृत पावलेला कर्ता व्यक्तीच असतो. अपघात झाल्यानंतर अपंगत्व आलेल्या व्यक्तीची अवस्था तर अतिशय वाईट असते. उत्पन्नास सुरुवात झाल्यावर योग्य नियोजन न केल्यामुळे अपघाती अपंगत्व आलेली व्यक्ती संपूर्णतहा दुसऱ्यावर अवलंबून जगते. अनेक प्रसंगी मानहानी आणि कौटुंबिक दयनीयता असहाय्य रित्या पाहणे हेच त्याचे आयुष्य बनते.     
मित्रांनो आर्थिक नियोजन हाच एकमेव योग्य पर्याय आपणांस अशाप्रकारच्या अडचणी पासून दूर ठेवू शकतो. आपल्या उत्पन्नाची सुरुवात झाल्यानंतर सर्वात प्रथम कार्य येणाऱ्या पैशाच्या नियोजनाचे करावे. भविष्यामध्ये येणाऱ्या मोठ्या खर्चाची तयारी छोट्या बचती आणि गुंतवणुकी मधून अगोदर पासूनच केली तर ऐन वेळी पैसे नसणे ही समस्या राहत नाही आणि ज्या कारणासाठी आपण नियोजन केले आहे त्याचा मनसोक्त आनंद घेता येतो. अचानक पने येणाऱ्या मेडिकल समस्येसाठी तयार राहता येते त्याच बरोबर अकाली मृत्यू हा टाळता येत नसला तरी आपल्या कुटुंबाची योग्य तरतूद कायम केली असल्यास त्याचे भय बाळगण्याचं कारण उरत नाही.

एकंदर उत्पन्नाच्या सुरुवातीस कुटुंबासाठी, स्वतःच्या प्रगती साठी आर्थिक नियोजनाचे उचललेले पाऊल आपणांस समृद्धी आणि खुशालीचे जीवन जगण्यासाठी कायम साथ देते.

या तर मग जाणून घेऊयात आर्थिक नियोजन नक्की कसे करावे.